Thursday, 6 September 2018

तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश पद्धतीचे वांग्याचे भरीत)

तुर्किश रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर शाकाहारींसाठी अगदी कमी पर्याय उपलब्ध असतात. फलाफल किंवा व्हेज डोनर हे नेहमीचेच प्रकार. हा काय वेगळा प्रकार दिसतोय म्हणून मागवला आणि फार आवडला. आपल्या वांग्याच्या भरताचाच भाऊबंद. थोडा बाबा गानुष च्या मार्गाने जाणारा पण यात तीळाचा वापर होत नाही. दह्यातले भरीत म्हणू शकतो. घरी करायला अगदीच सोप्पा वाटला. हा पदार्थ स्टार्टर्स मध्ये मोडणारा आहे. सोबत पिटा ब्रेड किंवा तत्सम प्रकार असतात. पण आपल्या भारतीय जेवणात पोळी भाजी किंवा खिचडी, भात यासोबत साईड डिश म्हणूनही चालतो.

साहित्य:

२ मध्यम आकाराची भरताची वांगी
६-७ लसूण पाकळ्या बारीक चिरून
थोडासा लिंबाचा रस
अर्धी वाटी घट्ट दही (मूळ पदार्थात ग्रीक योगर्ट वापरले जाते. घरचे घट्ट दही सुद्धा चालेल. फक्त पाणी अजिबात नको)
चवीपुंरते मीठ
ऑलिव्ह ऑइल
सजावटी साठी कोथिंबीर




कृती:

वांगी गॅसवर खरपूस भाजून घ्या. गॅसचा पर्याय नसेल तर ओव्हन मध्ये भाजू शकता. नंतर वांग्याचे साल काढून गर मॅश करा. यात थोडेसे ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, दही, मीठ, बारीक चिरलेला लसूण (अर्धाच घ्या कारण उरलेला अर्धा फोडणीसाठी हवा आहे) हे सगळे एकत्र करा.

थोडे ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात उरलेला लसूण आणि लाल तिखट घालून फोडणी करा. ती या मिश्रणावर ओता. वरून थोडी कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स घालून सर्व्ह करा.



तळटीपा:

१. फोडणीची स्टेप पर्यायी आहे.

२. वाळवलेली पुदिन्याची पाने , कांद्याची पात इत्यादी घालून देखील यात व्हेरीएशन करता येईल.



No comments:

Post a Comment