स्वयंपाकात लुडबुड करणाऱ्या मुलांमध्ये मी कधीच नव्हते. आईशी गप्पा मारत स्वयंपाक घरात बसायचे, तेव्हाही खास लक्ष दिलं नाही. पण आईच्या हातचे पदार्थ यापेक्षा, तिचं स्वयंपाकघर टापटीप ठेवणं, त्यातली मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग, घरी येणाऱ्यांची आवड लक्षात घेऊन तसे पदार्थ बनवणे, ते छान सजवून ठेवणे हे मी जास्त आवडीने बघत होते. स्वयंपाक तसा उशीराच शिकले, कासवाच्या गतीने का असेना, नवीन शिकत प्रयोग करत राहिले. पण जे काही केलं ते सगळं मन लावून केलं. एकटी साठी कुठे करायचं असं न म्हणता, उलट प्रयोगांना त्या निमित्ताने वाव मिळाला. हळूहळू आवड निर्माण होत गेली. उत्तम मऊसूत पोळ्या ते टम्म फुगलेल्या पुऱ्या, पुरणपोळी आणि प्रसादाचा शिरा सगळं जमायला लागलं. पदार्थांची सजावट आवडायची, त्यात इंटरनेट वरच्या फूड ब्लॉगर्सची भर पडली आणि नवीन बरंच काही शिकायला मिळालं.
परदेशात येऊन इथल्या स्वयंपाक घराशी, इथे मिळणाऱ्या नवीन पदार्थांशी जुळवून घेण्याची कसरत सुरू झाली. शिकवायला इंटरनेट होतंच. भाजी घरी करू, पोळ्या बाहेरून आणू हे पर्यायच नव्हते. चवीवर तडजोड करायची नसेल तर स्वतः करणे आलंच, मग न मिळणाऱ्या पदार्थाना पर्यायी घटक पदार्थ शोधले गेले, इथल्या भाज्यांना भारतीय टच द्यायला सुरुवात केली. काही प्रयोग जमले, काही बिघडले. इथे स्थानिक पदार्थ खाल्ले, घरी केले, तरी पोळी भाजी वरण भात हे प्राथमिक जेवण तेच राहिलं. मित्र मैत्रिणींना बोलावून खाऊ घालण्याचा उत्साह तसाच राहिला. इथे भारतीय मसाले, भाज्या यांची महती अजून जास्त कळली, त्याबद्दल अजून माहिती शोधली गेली. मग आई झाल्यावर अजून नवीन आव्हानं आली, त्यातून दमछाक झाली, पण घरातल्या पदार्थाचं वैविध्य वाढलं.
स्थानिक लोकांशी बोलताना आपल्या पदार्थाचं अप्रूप अजून वाढलं. बरेच पदार्थ हे झणझणीत तिखट नसतात, पण तरीही मसाल्यांचा स्वाद पदार्थ ज्या पद्धतीने खुलवतो ते समजत गेलं.
मधल्या काळात इथे वाढत चाललेली vegan पदार्थांची प्रसिद्धी बघून, त्यांचे पदार्थ बघून, थांबा जरा, आमच्या स्वयंपाक घरात रोजच्या भाज्या आमट्या Vegan च असतात, पण प्रत्येक ठिकाणी याला पर्याय हा, त्याला पर्याय हा असं करायची गरज नाही हे वाटायचं. Vegan, शाकाहारी, मांसाहारी सगळे गट मला आपापल्या जागी योग्य वाटतात, फक्त Vegan हे लेबल नसलेले, तरी असलेले अनेक पदार्थ आपण लहानपणापासून खात आलो आहोत एवढंच वाटतं.
मराठी लिखाण सुरू होतं, आहे, त्यासोबत जर्मन भाषिक लोकांसोबत आपली खाद्य संस्कृती आणि पाककृती शेअर कराव्यात असं वाटलं. आपले अगदी तूप जिर्याच्या फोडणीचे पदार्थ ते वाटण घाटण करून भरपूर मेहनत घेऊन केलेल्या तर्री वाल्या भाज्या, कोशिंबिरी आणि विविध डाळींचे पदार्थ, पोळ्या आणि पराठे असं प्रचंड वैविध्य जे आहे ते कुठेतरी जर्मन भाषेतून मांडावं वाटलं. इंग्रजीत यावर चिक्कार माहिती उपलब्ध आहे, पण स्थानिक लोक इथे त्यांच्या भाषेतून प्रीफर करतात. पण नुसतं वाटून काय होतंय, डोक्यात तीच चक्रं फिरायला लागली, ब्लॉगच नाव ठरलं. ब्लॉगचा ढाचा तयार करणे हे ही मोठं काम होतं, त्यातून जर्मन, हळूहळू एकेक पाऊल पुढे गेलं आणि ब्लॉग तयार झाला. मागच्या वर्षी त्याची सुरुवात केली. मी स्वतः काही सुगरण नाही, अनेक पदार्थ असे आहेत जे मला अजून येत नाहीत, शिकायचे आहेत, पण रोज जे काही करते ते मनापासून करते, एवढंच. त्यात मग फोटो, पदार्थाचं प्रमाण, त्याच्या जर्मन पद्धती, कंटेंट मध्ये काय काय हवं यावर विचार, शोधाशोध, अभ्यास सुरू झाला. रिस्पॉन्स कसा मिळेल, कशाला करायचं हे सगळं असे प्रश्न अनेकदा पडले, पण थांबावं वाटलं नाही. वर्षभरात १५-२० रेसिपी लिहायला जमल्या तर नंतर वेबसाईट करू असं मी स्वतः वरच बंधन घातलं होतं. ते जमलं. म्हणावा तसा रिस्पॉन्स अजून मिळाला नव्हता, पण हे काम करू शकतो असं वाटलं आणि मग वेबसाईट करू असं ठरवलं, तीच ही माझी वेबसाईट. Gemüse & Gewürze - भाज्या आणि मसाले असा त्याचा अर्थ :)
पाककृती हा गाभा असला तरी भारतीय स्वयंपाक घर, त्यातले घटक पदार्थ, प्रत्येक प्रांतात होणारे बदल, त्यातली वैशिष्टे आणि बरंच काही याबद्दल पण यावर लिहीणार आहे. जर्मन भाषिक लोकांना आपल्या भारतीय, महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न. आधी पडलेले प्रश्न अजूनही आहेत, किती यशस्वी होईल, खरंच लोक आवडीने वाचतील का, काही पदार्थ करून बघतील का, सगळं करताना इतकी कधी कधी तारांबळ उडते तरी हे करायचं का असे अनेक, पण हे सगळं मनापासून करावं वाटतं, त्यातून आनंद मिळतो आहे म्हणून करत राहायचं आहे. सध्या तरी पूर्णपणे आवड, हौस यातून हे उभं केलेलं आहे. यातून अजून तरी कोणताही आर्थिक फायदा नाही. इंस्टाग्राम आणि फेसबुक वरचे फॉलोअर हवेच आहेत, पण त्यातून आर्थिक उद्दिष्ट्ये नाहीत, ते भविष्यात काही झालं तर बघू पण सध्या त्यासाठी नोकरी व्यवस्थित सुरू आहे :)
यासाठी पण तुमचं प्रोत्साहन असू द्या. तुमच्या ओळखीत कुणी जर्मन लोक असतील, ज्यांना आपल्या भारतीय खाद्य संस्कृती, पाककृती यात रस असेल तर अवश्य शेअर करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लिंक पण वेबसाईट वर दिसेल.
https://gemueseundgewuerze.com/
No comments:
Post a Comment