Thursday, 8 April 2021

पुरणाचे पुराण

माझ्या बोलण्यात, आवडी निवडी सगळ्यात माझं विदर्भातील मूळ किती डोकावेल, दिसेल आणि आता किती बदल झालेत, पण मुख्य खाण्याच्या आवडी निवडी बऱ्याच वैदर्भीय आहेत. पण त्यातही विदर्भात केली जाणारी पुरण पोळी ही माझ्या साठी अगदी जाज्वल्य अभिमानाची गोष्ट आहे.


लहानपणी पुरण खूप आवडायचं नाही, पुरणाच्या पोळी पेक्षा आईनी जास्तीचं केलेलं नुसतं पुरण फ्रीज मधून काढायचं त्यावर गरम तूप घालून ते नुसतं खायला जास्त आवडायचं. पण मुळात मी साधी पोळी करायलाच खूप उशीरा शिकले, इतर स्वयंपाक पण गरज पडली तेव्हा नोकरी लागल्यावर हळूहळू करायला लागले. पण पुरण पोळी एकदा फक्त लाटली होती हे आठवतं आहे, मामा कडे काहीतरी निमित्ताने पुरणपोळी होती, कधी नव्हे ते मी चक्क स्वयंपाकघरात लुडबुड करत होते आणि मी लाटते एक पुरणपोळी असं म्हणाले. आई आणि मामी दोघीही आश्चर्याने बघत होत्या, पुरणपोळीची कणिक किती सैलसर असते, साधी पोळी पण कधी जमली नाही, प्रयत्न केला नाही आणि एकदम पुरणाची, हा प्रश्न नक्कीच त्यांना पडला असेल, पण माझ्यासाठी अज्ञानात सुख होतं, म्हणजे मला तेव्हा पोळ्या पण कठीणच वाटायच्या तर पुरण पोळ्या अजून कठीण, असू देत की म्हणून मी पण न घाबरता करायला घेतली पोळी. आई आणि मामीच आहेत म्हटल्यावर बिघडलं तरी काही टेन्शन नव्हतं. चक्क ती एकच पोळी मी अगदी नीट लाटू शकले. पुन्हा कधी स्वयंपाकाचा संबंध लगेच आला नाही, खूप रस पण घेतला नाही त्यात. हळूहळू स्वतःची गरज म्हणून सगळं शिकले. आणि स्वयंपाक मनापासून आवडायला लागला. पोळ्या करतानाची तंद्री ही स्ट्रेस बस्टर वाटू लागली आणि एकूणच बरेच पदार्थ स्वतःसाठी, घरच्यांसाठी आणि अगदी दहा लोकांसाठी पण आवडीने करायला लागले. (फेसबुक वर फोटो दिसले नाही तरी) एकटी साठी जेवढ्या उत्साहाने केलं, शिकले, तेवढ्याच उत्साहाने बऱ्याच लोकांसाठी साग्र संगीत स्वयंपाक पण अनेक वेळा केला. सृजनाच्या निमित्ताने तर बरीच आव्हानं आली आणि त्यातले प्रयोग चालूच आहेत. या सगळ्यात पुरण सहजा सहजी मी कधी करेल असं मलाही स्वतःला वाटलं नव्हतं, पण मला सगळ्या चांगल्या जमणाऱ्या पदार्थांमध्ये पुरण आता बरंच अग्रस्थानी आलं. 


मला लहानपणापासून पूर्ण साखरेचं पुरणच माहीत होतं आणि भरपूर पुरण भरून केलेल्या पोळ्या, त्यावर भरपूर तूप, सोबत कढी, चटण्या, वाटली डाळ, भाज्या आणि मग शेवटी छान वडा भात, अहाहा. पुरणासोबत हा बाकीचा स्वयंपाक जास्त आवडायचा आणि मग वर लिहिलं तसं ते नुसतं पुरण नंतर जास्त छान वाटायचं. पण तेव्हा फक्त खाणं माहीत होतं. घराबाहेर राहताना विकतच्या पोळ्या बघून त्या खाव्या वाटल्या नाही, सुरुवातीला गुळाची चवही जिभेला आवडली नाही, (काय म्हणी आठवतील तर असू द्या ;)) लग्नाआधी महालक्ष्म्या म्हणून सासरी गेले होते, सुमेध जर्मनीत होता. सकाळी उठून फोनवर म्हणे मी पुरण केलं. आम्ही सगळे चकित. मनात एकाच वेळी 'चला बरं झालं यालाच येतं सगळं',  'किती उत्साही आहे' म्हणून कौतुक ते आपल्याला पण आता पुरण शिकायला हवं असे सगळे विचार मनात येऊन गेले. 

पुण्यात जेव्हा एकटीच राहायचे, तेव्हा मला माझे सगळे प्रयोग करायला मोकळीक मिळायची. अनेक वेगवेगळे पदार्थ मी याच दरम्यान शिकले. तर अशीच काहीतरी निमित्ताने पुरण पोळीची हुक्की आली, आईकडून प्रमाण घेऊन केलं त्यामुळे साखर जास्त, गूळ कमी, शिवाय मिक्सर वापरला पुरण यंत्रा ऐवजी. ऑफिसच्या मैत्रिणींसाठी पण दुसऱ्या दिवशी घेऊन गेले, साखर आणि मिक्सर हे ऐकूनच काहींनी "नाही हे नीट नाही लागणार" म्हणून नाकं मुरडली आणि मग खाल्ल्यावर मात्र मनापासून आवडीने खाल्ली, चव वेगळी आहे थोडी पण खरंच छान झाली आहे अशा प्रतिक्रिया ऐकून अगदी भारी वाटलं आणि 

मग जर्मनीत आल्यावर सुरुवातीला मिक्सर पण नव्हतं, पण उत्साह होता. अगदी लहान अशा हॅन्ड मिक्सरने अनेक बॅचेस मध्ये पुरण वाटून, पोळ्या केल्या. पुरण करणे, म्हणजे मुख्य चमचा उभा राहतो या टेस्ट पर्यंत काम सुमेधचं, मग पोळ्या माझ्याकडे अशी विभागणी झाली. घरच्या पदार्थांच्या आठवणीत म्हणून की काय, पुरणपोळी जास्तच आवडायला लागली. पूर्ण साखर ते पूर्ण गूळ अशा सगळ्या चवींवरून, थोडी साखर आणि थोडा गूळ अशी चव जिभेवर जास्त रुळली. मग एका वर्षी दिवाळीच्या गेट टुगेदर साठी रात्री १२ पर्यंत जागून आम्ही पुरण पोळ्या केल्या. दर काही महिन्यांनी आपण पुरण केलं नाही बरेच दिवसात असे वाटून जरा जास्तच घाट घातले आणि प्रॅक्टिस होत गेली. मग या दरम्यान पुरण पोळ्यांवरचे अनेक लेख आणि रेसिपी वाचताना अनेक सुगरणींकडून लहान सहान टिप्स मिळत गेल्या आणि पोळ्या जास्त चांगल्या जमत गेल्या.

मधल्या काळात अनेक कारणांनी पुरण आणि पुरणपोळ्या काही झाल्या नाही. ईस्टर विकेंड ला करोनाचे काही नियम कमी करून दोन फॅमिली भेटणे शक्य होते. मग त्या निमित्ताने पुन्हा पुरणाचा घाट घातला. डाळ शिजवून झाल्यावर सुमेधने पुरण करायला घेतलं आणि मी कणिक मळायचं काम करून ठेवलं. सकाळी उठून आधी बाकी सगळा स्वयंपाक आणि मग शेवटच्या पुरण पोळ्या म्हणून सगळी तयारी झाली. कणकेच्या गोळ्यांपेक्षा पुरणाचा गोळा चौपट हवा असं वाचलं होतं, किमान तिप्पट तरी जमायला हवा असं त्यावेळचं ध्येय होतं, त्याप्रमाणे एक एक पोळी करत चळत वाढत गेली. सकाळी थोड्या पुरण पोळ्या करून आणि खाऊन, खिलवून झाल्या, जवळच्या मित्र परिवारासाठी डब्यात भरल्या, एका नुकत्याच ओळख झालेल्या नवीन भारतीय उत्तर भारतीय शेजार्यांना रात्री गरम गरम पुरण पोळ्या करून नेऊन दिल्या. (ठरवून पुरण जास्त केलं होतं) डबे दिले त्या सगळ्या मैत्रिणींकडून खूप आवडल्याची दाद मिळाली आणि मग लक्षात आलं की म्हणता म्हणता जवळ जवळ ३५ पुरण पोळ्या केल्या. आजवर अनेक वेळा केल्या तरी यावेळी चव आणि टेक्स्चर या दोन्ही पातळीवर आधीपेक्षा अजून चांगल्या जमल्या आणि काहीच स्वयंपाक न येणे ते आता इतर स्वयंपाकसोबत उत्तम पुरण पोळ्या जमणे हे सगळं स्वतःलाच छान वाटलं.

ऑफिसचं काम, करोनाचा वाढता प्रसार आणि त्यामुळे सतत भेडसावणारी चिंता, तो पुरण पोळ्या करताना आणि खाताना बाजूला राहिला. मग चला, पुरणपोळ्या विकाव्या का असा तात्पुरता विचारही मनात येऊन गेला. पण पुन्हा हे काही रोजचे काम नाही, आता उरलेल्या पुरणाच्या जमेल तशा पोळ्या करू, नाजूक, अगदी पारंपरिक पद्धतीने कणिक भिजवून, खास वेळ काढून अलगद प्रत्येक पोळी लाटायची हे काही नेहेमी नेहमी जमायचे नाही. वजन कमी करायचं हा संकल्प पुरण खाऊन झाल्यावर पुन्हा एकदा केला. नेहमी प्रमाणेच याही वेळी आठवणीने फोटो काढून ठेवणे काही झाले नाही, हे लक्षातच येत नाही, आणि ते नाही तर मग त्या ऐवजी संपूर्ण सुफळ झालेली पुरणाची गाथा लिहायलाच घेतली, पुढच्या वेळी आता निदान या लेखाला जोडायला म्हणून फोटो हवा या उद्देशाने पुन्हा पुरण होईलच. तोवर बाकी पदार्थांचेही फोटो काढून प्रॅक्टिस करावी म्हणते, फोटो सोबत पाल्हाळ लावायला लिखाण होईल आणि लिखाणाला सोबत म्हणून फोटो..





No comments:

Post a Comment